‘वय कुं ठत’ त्या वैकुंठताला विष्णु
विष्णुच्या वैकुंठातल्या राजवाड्याचं वर्णन पद्मपुराणात मजेशीर आहे. ते ‘स्वर्ग’ या प्रकरणात आहे. वैकुंठ हे पृथ्वीपासून अठरा कोटी योजनं दूर आहे. तिथल्या सरोवरात हंस, सारस, चक्रवाक विहार करतात. चंपक, अशोक, कल्हार, मंदार, बकुल यांची दिव्य झाडं तिझं आहेत. खुद्द विष्णुच्या प्रासादापुढे सुवर्णाची गोपुरं आहेत. त्याच्या चारी दिशांच्या दारावर दोन-दोन पहारेकरी आहेत. वैकुंठाच्या भोवती सात आवरणं आहेत. पुढे उत्तरायाध्यात सांगितलं आहे, की ब्रह्माची उपासना करणाऱ्याला वैकुंठ लोक मिळतो.
म्हणजे इतकंच, की संपूर्ण समता या ध्येयासाठी आयुष्य अर्पण केल्यावर, त्यामुळे मन शांत होतं. कारण ब्रह्मात शांती असते. आणि एकदा शांती मिळाली, की ‘वय’ वाढण्याचं कुठलं दु:ख? कारण वय कमी होतं ते अशंातीत शक्ती खर्च झाल्यामुळे. म्हणून एकदा शांती मिळाली की ‘वय’ कुंठतं. तीच वैयकुंठ-वैकुंठ अवस्था.
दक्षिणेकडे मुक्कोडी एकादशीची गंमतीदार कथा आहे, जिला महाराष्ट्रात ‘वैकुंठ एकादशी’म्हणतात.
रुक्मानंद नावाच्या एका राजाजवळ उत्कृष्ट फुलबाग होती. त्यातली फुलं इंद्राला हवी होती, म्हणून ती चोरण्यासाठी त्यानं देवांना पाठवलं. देव अदृश्य असल्याने चोरी कोण करतो ते कळेना. राजाच्या सेवकानं शेजारी सापडलेल्या जाबाली ऋषीलाच धरून चोर म्हणून राजापुढे उभं केलं. जाबालीची योग्यता रााजा जाणत होता. त्यानं उलट जाबालीचीच माफी मागितली.
पण आपल्यावरच्या आरोपाचं निराकरण जाबालीला करावंसं वाटलं. त्यानं दरबारी सज्जनांना बागेत बोलावलं; आणि काही वनस्पतींचा धूर तेथे केला. तो धूर झाल्याबरोबर अदृश्य देवांचे देह ताबडतोब जड झाले. आणि खरे चोर सर्वांच्यापुढे आपोआप आले.
सुलेव्हाननं लिहिले आहे, की गती जेव्हा प्रकाशवेगाअलीकडे येऊ लागते, तेव्हा तिचा ‘दृश्य’ जडपणा वाढत जातो. पाप हे चपल असतं, चंचल असतं, पण जडाच्या मर्यादेतच. संग्रह हे पापाचं लक्षण आहे. पुण्याचं नव्हे. असत्याने संग्रह करायला जातात तेव्हा देवही पुण्य गमावून बसतात. हे सूक्ष्म सृष्टीचे मर्म.
म्हणूनच धर्म त्यागबुध्दी सांगतो.त्याने समतादृष्टी येते. त्यातूनच “देह जावो अथवा राहो” अशी वृत्ती उमलते. वयाचा विचार सुटला की वय कुंठतं. या सर्व विचाराचा राजा म्हणजे “विष्णु”. त्याचा राजवाडा आणि प्रासाद ही ढोबळ सुखाची प्रतीकं आम्हाला माहीत आहेत. खरा विष्णु म्हणजे संकट-प्रतीक नागशेषावरसुध्दा निर्भय शांतीनं पहुडलेल विष्णु संकटाचा ‘शेष’सुध्दा मनात न बाळगणारा.