4. एकामुळे चार जिवंत

Date: 
Sun, 7 Aug 2011

चारी भाऊ बाजूला मरून पडले होते. ‘त्यापैकी कोणताही एक जिवंत कर. ‘म्हणून यक्ष धर्मराजाला परवानगी देत होता.
धर्मराजाने क्षणाचाही विचार न करता नकुलाकडे बोट दाखवले. राजबिंडा, नीटस शांत झोपल्यासारखा नकुलाचा देह जसा काही धर्म-राजाच्या प्रेमाने पेशीपेशीतून हसत होता.
यक्षाने चारही भावांना आधीच सल्ला दिला होता, की त्यांनी तळ्यातले पाणी पिऊ नये. तो सल्ला न जुमानता चारही भाऊ पाणी प्याले व मेले.
एकट्या धर्मराजाने यक्षाला नीट उत्तरे दिली व खूष करून टाकले. पण कोणत्याही एका भावाला जिवंत करण्याचा हक्क त्याने धर्मराजाला दिला, तेव्हा धर्मराजाचे उत्तर त्याला पटले नाही. तो आश्चर्याने म्हणाला, “अरे त्या नकट्या पोराला घेऊन तू काय करणार? भीम अर्जुन तुझे आधार. त्या दोघांपैकी कोणाही मुळे तुला तुझे राज्या परत मिळेल. “
धर्माने नकारार्थी मान फिरवली आणि तो म्हणाला, “मला राज्या नको आहे. मला न्याय हवा आहे. सत्य हवे आहे. आणि न्यायाने मिळाले तर राज्य.”
“नकुलाला पत्करून आणि अर्जुनाला डावलून, न्याय कसा साधणार? “यक्ष आश्र्चर्याने म्हणाला.
धर्मराजाची दृष्टी अर्जुनाकडे गेली. उंच, नितळ, तेजस्वी, वीरभद्र अर्जुन. धर्मराजाचा जसा काही अखेरचा निरोप मिटल्या पापण्यांनी घेत होता. आपले मन अर्जुनाकडे ओढले जात आहे, हे लक्षात आल्यावर धर्मराजाचे डोळे तेथून निग्रहाने वळले. तो यक्षाकडे वळून म्हणाला, “यक्षराज, कुंती आणि माद्री या दोन आयांचे आम्ही पाच पुत्र. कुंतीचा मुलगा म्हणून मी जिवंत आहेच पण माद्रीचा एक तरी मुलगा जिवंत हवा. म्हणून नकुल जिवंत उठवा. “
यक्षाची प्रज्ञा जिवंत झाली. त्याने नकुलाला जीवनस्पर्श दिला आणि मागोमाग तिन्ही भावांना. केवळ स्वार्थ मागितला म्हणजे स्वार्थ साधत नाही. पण नि:स्वार्थाच्या पोटात सर्व स्वार्थ साधतो.ही धर्माची विलक्षण प्रत्ययकारी सांगी आहे.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView